येरमाळा: “दारू पिऊन घरात रोज रोज भांडण-तक्रारी का करतोस?” या कारणावरून संतापलेल्या बापाने आणि सख्ख्या भावाने एका २२ वर्षीय तरुणाचा लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील उपळाई येथे घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मयताच्या वृद्ध आजीलाही जबर मारहाण करण्यात आली आहे. या कौटुंबिक हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लोखंडी पाईपने केला प्राणघातक हल्ला
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पृथ्वीराज किशोर चव्हाण (वय २२ वर्षे, रा. उपळाई, ता. कळंब, जि. धाराशिव) याला दारूचे व्यसन होते आणि तो दारू पिऊन घरात सतत भांडणे करत असे. याच कारणाचा राग मनात धरून शनिवारी (२० जून २०२६) दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास उपळाई येथील महादेव चव्हाण यांच्या घराजवळ, श्री दत्त संस्थान मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला घेरण्यात आले.
आरोपी किशोर बाबासाहेब चव्हाण (वडील) आणि विनोद बाबासाहेब चव्हाण (भाऊ) यांनी पृथ्वीराजला रस्त्यात अडवून दारू पिऊन भांडण करण्याबाबत जाब विचारला. वाद वाढल्याने दोघांनी हातातील लोखंडी पाईपने पृथ्वीराजवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. डोक्यात आणि शरीरावर लोखंडी पाईपचे गंभीर घाव बसल्याने पृथ्वीराज रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
नातवाला वाचवायला गेलेल्या वृद्ध आजीलाही झोडपले
हा भयानक मारहाण सुरू असताना पृथ्वीराजची ६७ वर्षीय आजी रुक्मीण बाबासाहेब चव्हाण या नातवाला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या. मात्र, संतापाने अंध झालेल्या आरोपींनी वृद्ध आजीचाही मुलाहिजा न बाळगता त्यांनाही लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
येरमाळा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
हल्ल्यानंतर जखमी आजी रुक्मीण चव्हाण यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० जून २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपी वडील किशोर चव्हाण आणि भाऊ विनोद चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खुन), ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत करणे) आणि ३(५) (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, येरमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.






