धाराशिव – लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होऊन निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच धाराशिव लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच फोडण्यात आला आहे, तर दुसरीकडे भाजपची उमेदवारी अभिमन्यू पवार की बसवराज पाटील यांना द्यायची , यावरून मतभिन्नता दिसून येत आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील ) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीचे पारडे आणखी जड झाले आहे
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी फिक्स आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फोडण्यात आला आहे, ठाकरे यांनी औसा, उमरगा, तुळजापूर, कळंब , भूम अश्या पाच ठिकाणी सभा घेऊन शिवसैनिकांना टॉनिक दिले आहे. पण यंदाच्या निवडणुकीत खासदार ओमराजे यांना एकाकी लढत द्यावी लागणार आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचा शरद पवार गट कमजोर आहे. काँग्रेसची अवस्था शोचनीय आहे. राजकारणात अडगळीत पडलेल्या ओमराजेंना गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या करिश्मामुळे लॉटरी लागली होती. परंतु यंदा उद्धव ठाकरे यांनी मोदीविरुद्ध घेतलेली भूमिका जनतेला आवडलेली नाही, त्यामुळे ओमराजे यांची यंदाच्या निवडणुकीत दमछाक होणार आहे.
दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार, हे जवळपास निश्चित आहे. पण भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार ? याबाबत औत्सुक्य आहे. औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना यंदा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अभिमन्यू पवार खासदार झाल्यानंतर औसा येथून बसवराज पाटील यांना भाजपची उमेदवारी देण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. मात्र अभिमन्यू पवार हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रबळ ठरू शकत नसल्याने काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी द्यावी, असे काही भाजप कार्यकर्त्याचे मत आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी नक्की कुणाला मिळणार, याकडे लक्ष वेधले आहे.