तुळजापूर – तुळजापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाला खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बीड येथील एका २५ वर्षीय तरुणाला शिताफीने अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
१ सप्टेंबर २०२६ रोजी निनाबाई चौगुले या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवून “सोन्याचे बिस्कीट देतो” असे सांगून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन खोटे बिस्कीट देत त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४३०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी ऋषीकेश बंडू जाधव (वय २५ वर्षे, रा. गांधी नगर, तेलगाव नाका, बीड) याच्यावर पाळत ठेवून ५ सप्टेंबर २०२६ रोजी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच आपल्या इतर साथीदारांची नावेही सांगितली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले मोटार वाहन असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण तसेच चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




