धाराशिव- महामार्गावर प्रवाशांना अडवून मारहाण करत जबरी लूटमार करणाऱ्या तसेच सोलर केबल चोरणाऱ्या एका कुख्यात टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या अंगावर आयशर टेम्पो घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले, तर तिघे पसार झाले आहेत. या कारवाईत आयशर टेम्पो, अर्टिगा कार आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण २४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या अंगावर घातला आयशर टेम्पो; पाठलाग करून पकडले
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ६ सप्टेंबर २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना, एका आयशर टेम्पोमधून काही संशयित दरोड्याच्या साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने सोनेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली. पहाटे ५.५० वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर चालकाला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने थेट पोलीस पथकाच्या अंगावर टेम्पो घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलीस अंमलदार बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले.
यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहनाचा थरारक पाठलाग केला आणि आंबेजवळगा शिवारात स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पो अडवून तिघांना पकडले, तर त्यांचे इतर तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) आनंद उर्फ आकाश शामराव पवार (वय २७ वर्षे, रा. आळणी, ता. जि. धाराशिव)
२) बल्या उर्फ सोनु अशोक शिंदे (वय २३ वर्षे, रा. गोलेगाव, ता. भूम, जि. धाराशिव)
३) शंकर गणा काळे (वय २४ वर्षे, रा. जयभवानी नगर, ढोकी, ता. जि. धाराशिव)
चोऱ्यांची कबुली अन् २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, त्यांनी ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलर प्रकल्पांमधून केबल चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून लुटलेली अर्टिगा कार, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो (क्रमांक MH 24 BW 9506) असा एकूण २४ लाख ८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तिन्ही आरोपींना जप्त केलेल्या मालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, चालक केदार शेरखाने, विनायक दहीहंडे, प्रकाश बाईनवाड व क्यूआरटी (QRT) पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



