बेंबळी – घरामध्ये हिस्सा देण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या पतीला गैरकायद्याची मंडळी जमवून बांबू, लोखंडी फायटर, दगड व विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना मेडसिंगा येथे घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मेडसिंगा येथील भीमनगर (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी काजल महादेव कांबळे (वय ३१ वर्षे) व त्यांचे पती हे ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास घरात असताना घराच्या वाटणीवरून वाद झाला.
या कारणावरून धाराशिव शहरातील काकानगर येथील शुभम महेश सोनवणे, आशिष शरद कांबळे, अन्नपूर्णा शरद कांबळे, अभिजीत सतीश ओव्हळ आणि साईप्रसाद शांतीलाल शर्मा यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी फिर्यादी काजल कांबळे व त्यांच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच बांबू, फायटर, दगड आणि विटांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पुन्हा घराचा हिस्सा मागितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
बेंबळी पोलिसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
या मारहाणीनंतर काजल महादेव कांबळे यांनी ६ सप्टेंबर २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी काकानगर येथील पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३३३, १८९(२), १९०, १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.



