नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथे दारू पिण्यासाठी पैसे मागून ते न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला लोखंडी पान्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
बसवंतवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी ज्ञानेश्वर शशीकांत बोबडे (वय २६ वर्षे) हे ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान आरळी (बु.) येथील महादेव वरकट यांच्या टायर पंक्चरच्या दुकानासमोर थांबले होते.
त्यावेळी गावातील शशीकांत नाना घोडके आणि रोहन उर्फ पिल्या किरण गिड्डे (दोघे रा. आरळी बु., ता. तुळजापूर) यांनी ज्ञानेश्वर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. ज्ञानेश्वर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पान्याने जबर मारहाण करून जखमी केले व पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंद
या घटनेनंतर ज्ञानेश्वर बोबडे यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी शशीकांत घोडके व रोहन उर्फ पिल्या गिड्डे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.





