धाराशिव – गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान पारंपारिक वाद्यांना बगल देत, पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करून वाहनांवर अवाजवी उंची व रुंदीची आरास उभारणे तसेच मर्यादेपेक्षा जास्त कर्णकर्कश आवाजात डॉल्बी-डीजे साऊंड सिस्टीम वाजवणे साऊंड ऑपरेटरांना चांगलेच भोवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी धाराशिव पोलिसांनी तिघांविरुद्ध ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध कलमांन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकी घटना काय?
१४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साऊंड सिस्टीम चालकांनी वाहनांवर क्षमतेपेक्षा जास्त रुंदीची आणि रस्त्यावरील विजेच्या तारांना स्पर्श होईल अशा अवाजवी उंचीची आरास लावली होती. यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण होऊन, विजेच्या तारा लागून श्रीगणेशाच्या प्रतिमेस तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती.
याव्यतिरिक्त, पोलीस अधीक्षक यांनी ध्वनी मर्यादेबाबत जारी केलेल्या आदेशांना धाब्यावर बसवून, विहित तीव्रतेपेक्षा अत्यंत कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले.
यांच्याविरुद्ध नोंदवले गुन्हे
पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी खालील डॉल्बी ऑपरेटर व संबंधितांवर कारवाई केली आहे:
-
सचिन शंकर शिंदे (वय ३८ वर्षे, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
-
यशराज बाबासाहेब गाठे (रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव)
-
पोपट रावसाहेब पवार (वय ४४ वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव)
दाखल झालेली कलमे
नमुद व्यक्तींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालील कायद्यांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:
-
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम २२३, २८९, २९२, २९३ आणि ३(५)
-
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०००: कलम ३, ४, ५, ६
-
पर्यावरण संरक्षण अधिनियम: कलम ३, १५
जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आणि नियमावली धाब्यावर बसवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.



