धाराशिव- कळंब तालुक्यातील भाटसांगवी पाटीजवळ बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल कंबरेला खोवून फिरणाऱ्या एका तरुणाला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सापळा रचून शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपीकडून २६ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई कशी झाली?
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत असताना, १९ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक कळंब शहर परिसरात पेट्रोलिंग करत होते.
यादरम्यान पथकाला गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, भाटसांगवी पाटीजवळ एक इसम संशयास्पदरीत्या थांबला असून त्याच्याजवळ गावठी पिस्तूल आहे. माहिती मिळताच पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून तत्काळ भाटसांगवी पाटी येथे धाव घेतली. सायंकाळी ४.०० वाजेच्या सुमारास संशयित इसम तिथे थांबलेला दिसताच पथकाने गाडीतून उतरून त्याला चौफेर गराडा घालत शिताफीने ताब्यात घेतले.
कंबरेला खोवलेले गावठी पिस्तूल व काडतूस हस्तगत
ताब्यात घेतलेल्या इसमाकडे नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेला लोखंडी धातूचा व लाकडी ग्रीप असलेला एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला.
कळंब पोलिसांत गुन्हा नोंद
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला कळंब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, चालक पोलीस अंमलदार दहीहांडे तसेच RCP च्या चार पोलीस अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






