उमरगा – उमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेलवर ग्राहक (गिऱ्हाईक) बोलावण्याच्या कारणावरून वाद पेटला असून, तीन जणांनी एका ४० वर्षीय व्यक्तीला लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून उमरगा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
जकेकुर (ता. उमरगा) येथील रहिवासी दिगंबर मारुती माने (वय ४० वर्षे) हे १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उमरगा ते सोलापूर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस, जकेकुर चौरस्ता शिवारात थांबले होते.
त्यावेळी हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बोलावण्याच्या क्षुल्लक कारणावरून जकेकुर येथील रहिवासी विशाल दयानंद स्वामी, दयानंद स्वामी आणि राजेंद्र दयानंद स्वामी यांनी संगनमत करून दिगंबर माने यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत माने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पाईपने जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ व गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता “तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकीही आरोपींनी दिली.
उमरगा पोलिसांत गुन्हा नोंद
या प्राणघातक हल्ल्यानंतर जखमी दिगंबर माने यांनी १० ऑक्टोबर २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी :
१) विशाल दयानंद स्वामी
२) दयानंद स्वामी
३) राजेंद्र दयानंद स्वामी (सर्व रा. जकेकुर, ता. उमरगा, जि. धाराशिव)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५).
महामार्गालगत भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.




