तुळजापूर: आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाच्या धामधुमीत तुळजापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळ विषारी ताडी (शिंदी) पिऊन आपापसात भिडलेल्या दोन तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दरम्यान, एका तरुणाचा मृत्यू पोलीस ठाण्यात झाल्याने संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला असून, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवादरम्यान शहरात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. सोमवारी रात्री लातूर रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात २० ते २२ वयोगटातील दोन तरुण विषारी ताडी पिऊन गोंधळ घालत होते. नशेत असतानाच या दोघांमध्ये जोरदार वाद होऊन किरकोळ झटापट झाली. यात एक तरुण खाली कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुसऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच या दुसऱ्या तरुणाचाही संशयास्पद मृत्यू झाला.
नातेवाईकांचा पोलिसांवर मारहाणीचा आरोप
दुसऱ्या तरुणाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला असून तरुणाचा मृत्यू मारहाणीने झालेला नाही, असा दावा केला आहे.
मृत्यूचे नेमके कारण काय? उलट-सुलट चर्चा
या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
-
विषारी ताडीच्या तीव्र नशेतून विषबाधा झाली?
-
दोघांमधील झटापटीत अंतर्गत दुखापत झाल्याने मृत्यू झाला?
-
की नातेवाईकांच्या आरोपाप्रमाणे पोलिसांच्या मारहाणीत एकाचा बळी गेला?
हे तिन्ही प्रश्न सध्या अनुत्तरित असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक तुळजापुरात येत असताना प्रशासनाने सुरक्षा चोख ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात अवैध ताडी आणि दारूचे धंदे खुलेआम सुरू असल्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेवर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


