धाराशिव : जिल्ह्यातील ढोकी आणि आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरणाच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी संबंधितांना अज्ञात कारणासाठी गुप्तपणे व गैरपणे घेऊन गेल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदवले आहेत.
ढोकीतून ५२ वर्षीय व्यक्तीचे अपहरण
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिमनगर येथे ५२ वर्षीय व्यक्तीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. माणिक कोंडीबा आदमाने (वय ५२, रा. पिंपरी आंबा, ता. जि. लातूर) हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता भिमनगर, ढोकी येथून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध होण्यासाठी अपहरण करून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी माणिक आदमाने यांची मुलगी प्रियंका समाधान ढवारे (वय २६, रा. भिमनगर, ढोकी) यांनी १६ ऑक्टोबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करीत आहेत.
आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचे अपहरण
दरम्यान, आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी उपळा रोड परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. विकास राजेंद्र गौतम (वय १६) हा एमआयडीसी उपळा रोड येथील ई कॅम्पुसल लि. कंपनीमध्ये असताना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध होण्यासाठी अपहरण करून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विकासचा काका बिरेंद्र कुमार गौतम (वय ३५, रा. भगवतपूर, पोस्टे टेउवा ग्रांट, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. एमआयडीसी उपळा रोड, धाराशिव) यांनी १६ ऑक्टोबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अपहरणामागील नेमके कारण आणि संशयित व्यक्तींबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


