धाराशिव –हॉटेलमध्ये सतत रागावत असल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करून चार राज्यांच्या सीमा ओलांडून पसार झालेल्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ४८ तासांत माग काढून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चकवा देणाऱ्या दोन आरोपींना तेलंगणा परिसरातून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरणी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील हॉटेल व्यावसायिक धीरज धर्मराज सोमवंशी (वय २४ वर्षे) यांना त्यांचे हॉटेलमधील वेटर सतत रागावत असल्याचा राग मनात धरून होते. दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:३० ते दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०१:०० वाजण्याच्या सुमारास, भंडारी शिवारातील सुवर्णा धनंजय पाटील यांच्या शेतासमोर पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपींनी पाठीमागून डोक्यात व चेहऱ्यावर प्राणघातक हत्याराने वार करून धीरज सोमवंशी यांची निघृण हत्या केली. या घटनेप्रकरणी मयत धीरज यांचे बंधू शुभम धर्मराज सोमवंशी (वय २६, रा. आरणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना चकवा देण्यासाठी चार राज्यांतून प्रवास
हत्येनंतर आरोपी तातडीने फरार झाल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी धाराशिव येथून सोलापूर रेल्वे स्थानक गाठले आणि तिथून कर्नाटक (यादगीर), आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा (हैदराबाद, निजामाबाद आणि तुप्रान) असा शेकडो किलोमीटरचा प्रवास केला. मात्र, पोलिसांनी सातत्याने माग काढत अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दोघे आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश पांडव मेहर (वय ३२ वर्षे, रा. खरमुंडा, ता. भटली, जि. बरगड, राज्य ओडिशा) व मोहम्मद वारीस सफोल अन्सारी (वय १९ वर्षे, रा. मध्धुपुर, ता. मध्धुपुर, जि. देवघर, राज्य झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
तपास पथकाची कामगिरी
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गादेकर, नागनाथ गुरव आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





