धाराशिव: श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या (११ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२६) पार्श्वभूमीवर, विशेषतः कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूर शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री (००:०१ वाजल्यापासून) ते २६ ऑक्टोबरच्या रात्री २४:०० वाजेपर्यंत तुळजापूरकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या व जड वाहनांना (Light & Heavy Vehicles) मुख्य मार्गांवर प्रवेशबंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भातील संयुक्त अधिसूचना जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी जारी केली आहे.
लाखो पायी भाविकांच्या सुरक्षेसाठी निर्णय
२५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा व २६ ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा साजरी होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक सोलापूर, नळदुर्ग, लातूर व धाराशिव मार्गे पायी चालत तुळजापूरकडे येतात. भाविक रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला विश्रांती घेतात. या मार्गांवरून नियमितपणे होणारी जड वाहतूक सुरू राहिल्यास अपघाताचा मोठा धोका संभवतो. हा धोका टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१)(ब) अन्वये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
बंद मार्ग व पर्यायी मार्गांची रचना (२३ ते २६ ऑक्टोबर २०२६)
| प्रवासाचा मार्ग | बंद असलेला मूळ मार्ग | पर्यायी / वळविण्यात आलेला मार्ग |
| धाराशिव ⇄ हैदराबाद | धाराशिव ⇄ तुळजापूर ⇄ नळदुर्ग ⇄ उमरगा | धाराशिव ⇄ औसा ⇄ उमरगा ⇄ हैदराबाद |
| हैदराबाद ⇄ छत्रपती संभाजीनगर | उमरगा ⇄ नळदुर्ग ⇄ तुळजापूर ⇄ धाराशिव |
मार्ग १: उमरगा ⇄ औसा ⇄ लातूर ⇄ अंबाजोगाई ⇄ मांजरसुंबा ⇄ बीड ⇄ छत्रपती संभाजीनगर
मार्ग २: उमरगा ⇄ औसा ⇄ लातूर ⇄ मुरुड ⇄ ढोकी ⇄ येडशी ⇄ बीड ⇄ छत्रपती संभाजीनगर
|
| धाराशिव ⇄ सोलापूर | धाराशिव ⇄ तुळजापूर ⇄ तामलवाडी ⇄ सोलापूर | धाराशिव ⇄ वैराग ⇄ सोलापूर |
| लातूर ⇄ सोलापूर | औसा ⇄ तुळजापूर ⇄ तामलवाडी ⇄ सोलापूर | लातूर (मुरुड) ⇄ ढोकी ⇄ येडशी ⇄ बार्शी ⇄ सोलापूर |
| छत्रपती संभाजीनगर ⇄ सोलापूर | येरमाळा ⇄ धाराशिव ⇄ तुळजापूर ⇄ तामलवाडी ⇄ सोलापूर | येरमाळा ⇄ बार्शी ⇄ सोलापूर |
| तुळजापूर ⇄ सोलापूर | तुळजापूर ⇄ तामलवाडी ⇄ सोलापूर | तुळजापूर ⇄ मंगरूळ पाटी ⇄ इटकळ ⇄ बोरामणी ⇄ सोलापूर |
| तुळजापूर ⇄ बार्शी | तुळजापूर ⇄ ढेकरी ⇄ गौडगाव ⇄ बार्शी |
तुळजापूर ते बार्शी: तुळजापूर ⇄ धाराशिव ⇄ बार्शी
बार्शी ते तुळजापूर: बार्शी ⇄ वैराग ⇄ धाराशिव ⇄ तुळजापूर
|
अत्यावश्यक सेवांना निर्बंधांमधून सूट
पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांची वाहने आणि एस. टी. महामंडळाच्या बसेस (MSRTC) यांना या वाहतूक बंदीतून सूट देण्यात आली असून त्यांची वाहतूक सुरळीत सुरू राहील.
नागरिकांनी व वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन धाराशिव जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.




