भूम – घरात घुसून अत्याचार करत मोबाईलमध्ये काढलेले अश्लील छायाचित्रीकरण नातेवाईकांना पाठवून व्हायरल करण्याची धमकी देत एका २४ वर्षीय तरुणीवर लॉजवर नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर “माझ्याशी लग्न करून धर्म स्वीकारला नाहीस तर बदनामी करेन,” अशी धमकी देत जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२० पासून ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित तरुणाने तरुणीच्या घरी जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे आक्षेपार्ह छायाचित्रीकरण (फोटो/व्हिडिओ) केले.
हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला विविध ठिकाणच्या लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर, “मी सांगेन तशी वागली नाहीस, माझ्याशी लग्न केले नाहीस आणि माझा धर्म स्वीकारला नाहीस तर हे सर्व फोटो तुझ्या नातेवाईकांना पाठवून बदनामी करीन,” अशी उघड धमकी देत आरोपीने तिच्यावर धर्मांतरासाठी सातत्याने दबाव आणला.
भूम पोलिसांत गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद
संशयिताच्या सततच्या मानसिक, शारीरिक त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित तरुणीने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भूम पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. तिच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे:
-
आरोपी : एका गावातील तरुण (पीडितेच्या संरक्षणासाठी व कायदेशीर तरतुदींनुसार नाव-गाव गोपनीय).
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) (बलात्कार), ६४(२)(एम), ६९ (लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध), ३१८(४), ३१९, ३५१(२) (धमकी देणे), ७८, ७९ सह महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ चे कलम ९.
अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत धर्मांतरासाठी धमकावल्याच्या या गंभीर प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, भूम पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.



