कळंब : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेच्या डोक्यात चैन आणि दगडाने मारहाण करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला कळंब पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हासेगाव शिवारातील मानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावरगाव) यांच्यावर आरोपीने चारित्र्यावर संशय घेतून चैन व दगडाने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बंडू विश्वांभर पवार (वय ५१, रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोठ्यातून आरोपीला घेतले ताब्यात
खुनाची घटना घडल्यानंतर आरोपी गणेश उर्फ विनायक टेकाळे हा फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. आरोपी वारंवार आपले वास्तव्य बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळंब पोलिसांच्या पथकाने पुनर्वसन सावरगाव शिवारातील एका शेतातील गोठ्यातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल १७७७ अनिल भोसले, पोलीस कॉन्स्टेबल १८३२ किरणमाळी, पोलीस कॉन्स्टेबल ६९६ औदुंबर गजबार आणि पोलीस कॉन्स्टेबल ९७६ सुनील तारळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.





