धाराशिव : आर्थिक व्यवहार आणि मयताच्या आईचे छायाचित्रण करून ते व्हायरल करण्याच्या कारणावरून धमकावल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांचाही समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्तीक शिवाजी घंटे (वय २८, रा. श्रीकृष्णनगर, धाराशिव) यांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक सुयश शिवाजी घंटे (वय ३०, रा. श्रीकृष्णनगर, धाराशिव) यांनी २ नोव्हेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींना मयत स्वस्तीक घंटे हे महादेव कोळी समाजातील असल्याची माहिती असतानाही, आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तसेच मयताच्या आईचे छायाचित्रण करून ते व्हायरल करण्याच्या कारणावरून त्यांना धमकावण्यात आले. या धमक्यांमुळे मानसिक त्रासाला कंटाळून स्वस्तीक घंटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पृथ्वीराज सिद्धेश्वर लोंढे, सौरभ सिद्धेश्वर लोंढे, विराज देवानंद झेंडे, बंटी हर्षद बनसोडे, हर्षद बनसोडे, श्रीनिवास शशिकांत मुंढे, ऋतुराज अनुरथ नागटिळक, ऋषीकेश बप्पासाहेब ढवळे, अभिजीत साखरे, शुभम गायकवाड, प्रदीप वाघमारे आणि शुभम कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(२)(व्ही), ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, फिर्यादीतील आरोपांची चौकशी सुरू आहे.




