येवती (तुळजापूर) : नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याच्या किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने (फुंकणी) वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथे घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवती येथील डोंबाळे वस्तीवरील रहिवासी खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६ वर्षे) यांच्याकडे त्यांचा मुलगा श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९ वर्षे) याने १० नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, वडील खंडू डोंबाळे यांनी पैसे देण्यास नकार दिला.
पैसे न मिळाल्याने संतापलेल्या श्रीशैल याने वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने घरात असलेली लोखंडी पाईपची फुंकणी उचलून वडील खंडू डोंबाळे यांना बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत वर्मी घाव बसल्याने खंडू डोंबाळे यांचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेनंतर मयताची पत्नी तथा आरोपीची आई सुरेखा खंडू डोंबाळे (वय ५० वर्षे, रा. डोंबाळे वस्ती, येवती) यांनी ११ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.





