उमरगा : शहरातील शास्त्रीनगर परिसरातून एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुप्तपणे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहृत वृद्धाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी भारताबाई परमेश्वर कटके (वय ६५ वर्षे) यांचे पती परमेश्वर नरसिंग कटके (वय ७५ वर्षे) हे १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरातून अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना डांबून ठेवण्याच्या उद्देशाने गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, भारताबाई कटके यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) (चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.





