शिंदेवाडी (धाराशिव) : किराणा सामान आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४३ वर्षीय व्यक्तीला चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांसह लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीही चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी गोविंद रामा मासुळे (वय ४३ वर्षे) हे ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास गावात असताना संशयित आरोपींशी त्यांचा वाद झाला. गावातीलच आरोपी बालाजी राजेंद्र मंजुळे, व्यंकटेश राजेंद्र मंजुळे, किरण शंकर मंजुळे आणि गंगाराम रामा चौगुले (सर्व रा. शिंदेवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी किराणा सामान आणि हातउसनवार आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून गोविंद मासुळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर चारही आरोपींनी संगनमत करून मासुळे यांना लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठीने आणि दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर १० नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या प्रथम खबरेवरून (फिर्यादी ज्ञानेश्वर लिमकर यांच्या तक्रारीनुसार) बालाजी मंजुळे, व्यंकटेश मंजुळे, किरण मंजुळे आणि गंगाराम चौगुले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२) (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), ११८(१) (धोकादायक शस्त्र किंवा साधनाने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





