कळंब : “तुम्हाला बक्षीस म्हणून आयफोन (iPhone) लागला आहे” असे खोटे आमिष दाखवून एका ४४ वर्षीय व्यक्तीकडून वेळोवेळी तब्बल १ लाख ७२ हजार ८७३ रुपये उकळून त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेलगाव जहागीर (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील रहिवासी दाजी कल्याण पाटील (वय ४४ वर्षे) यांच्या मोबाईलवर ८१०००३४७७९ या क्रमांकावरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. समोरील व्यक्तीने “मी मनीष जैन बोलत आहे, तुम्ही दाजी कल्याण पाटील बोलत आहात का?” अशी विचारणा करून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर संबंधित भामट्याने पाटील यांना “तुम्हाला आयफोन लागला आहे” असे आमिष दाखवले. बक्षिसाचा हा महागडा फोन मिळवण्याच्या नावाखाली विविध कारणे सांगून आरोपीने दाजी पाटील यांना वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण १ लाख ७२ हजार ८७३ रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र, पैसे भरूनही कोणताही आयफोन न मिळाल्याने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
अखेर दाजी कल्याण पाटील यांनी २६ नोव्हेंबर रोजी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) (फसवणूक करणे) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.





