मुंबई / तुळजापूर : : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने विशेषतः मराठवाड्यासह अनेक भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीला ३ कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत दिली आहे.
आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार, आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने उपस्थित होते.
विश्वस्त समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त समितीच्या बैठकीत शासनाच्या मदतकार्यास हातभार लावण्यासाठी ३ कोटी रुपये देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. या बैठकीस नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते.
मंदिर संस्थानची सामाजिक बांधिलकी कायम
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने यापूर्वीही राज्यातील नैसर्गिक आपत्तींच्या काळात नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे:
-
२०१९ मधील पूरस्थिती: कोल्हापूर, सांगली आणि पुणे येथील महापुराच्या काळात पूरग्रस्तांना अन्नधान्य किट, पिण्याचे पाणी व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची मदत दिली होती.
-
सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी: राज्यातील अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी रुपये आणि पूरग्रस्त महिलांना १ हजार साड्यांचे वाटप करण्यात आले होते.





