धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी भव्य रॅली काढून नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे , काँग्रेसचे माजी मंत्री अमित भैय्या देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार रोहीत दादा पवार, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. सभेत तिन्ही नेत्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या कारभारावर कडाडून टिका केली.
मंगळवारी सकाळी 11.00 वाजता धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवी व हजरत ख्वाजा शमसोद्दिन गाजी रहे यांचे आशीर्वाद घेऊन नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, संत गाडगे महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुषांना अभिवादन करुन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली.
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगर परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, माजी मंत्री अमित भैय्या देशमुख, आमदार रोहीत दादा पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. सभेला धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, वाशी, बार्शी, औसा तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अब की बार, भाजपा तडीपार – आदित्यजी ठाकरे
भाजपा सरकारने दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानीची शेतकर्यांना भरपाई दिली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचय काळात शेतकर्यांना तातडीने भरपाई दिली. म्हणून आता ‘अब की बार, भाजपा तडीपार’ हे निश्चित आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात पुन्हा ओमराजे हेच खासदार होणार आहेत. पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. धाराशिवसोबत महाराष्ट्राला, दिल्लीला मशाल दाखवायची आहे. भाजपाने शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली आणि आता ठाकरे गट फोडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. पण ते आता शक्य नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांकडून सभेसाठी मला बोलावले जात आहे. परंतु मी पहिल्यांदा ओमराजे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी हजर झालो. शेतकर्यांचे सरकार निवडून आणायचे असेल तर ओमदादांना निवडून द्या, असेही ते म्हणाले.
निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार – आ.रोहीतदादा पवार
पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हात 10 वाजून 10 मिनिटे असायची. त्यांनी घड्याळ चिन्ह चोरले. आता त्यात 4.20 वाजले आहेत. या लोकसभा निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार आहेत, असे सांगून आ.रोहीतदादा पवार म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर आर्थिक ताकद मोठी आहे. ती ताकद या निवडणुकीत पायदळी तुडवून टाका. ही निवडणूक आपण आताच जिंकलेली आहे, फक्त मताधिक्य किती मिळणार? याची उत्सुकता आहे. शरद पवार साहेब यांचे कुटुंब हे केवळ पवार घराण्यापुरते नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही पवार साहेबांचे कुटुंब आहे. भाजपा सरकारने मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न अजून अधांतरी ठेवला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडवून ठेवल्या. नेते गेले तरी निष्ठावंत कार्यकर्ता आणि सामान्य जनता आपल्यासोबत आहे. म्हणून भाजपाला हद्दपार करण्यासाठी आणि इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असेही ते म्हणाले.
देशाच्या भवितव्याची ही निवडणूक – अमितभैय्या देशमुख
महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पवनराजे यांचे नाते आगळेवेगळे होते. हे नाते जपण्याकरिता आपण स्वतः ओमराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितभैय्या देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, धाराशिवच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची जनतेला चीड येत आहे. आधी शिवसेना नंतर पवार कुटुंब फोडले. याचा बदला घ्यायचा असेल तर जनतेने आता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, मोठे उद्योग उभारण्यासाठी, मतदारसंघात सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी ओमराजे यांना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. म्हणून जनतेच्या हक्काचे सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उमेदवार खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, ज्यांनी 2019 साली पक्षाशी गद्दारी करुन भाजपात गेले. त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. म्हणून पुन्हा पक्ष बदलावा लागला. तेच लोक आता माझ्या फोनबाबत बोलत आहेत. पण सामान्य माणसाचे काम मार्गी लावण्यासाठी मी फोन उचलून बोलतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वावर आम्ही चालतो आहोत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या काळात धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय नेरुळला कोणी पळवून नेले, हे जनतेला ठाऊक आहे. स्वतःच्या ट्रस्टला वैद्यकीय महाविद्यालय जोडून ते स्वतःच्या मालकीचे केले. या वैद्यकीय महाविद्यालयात स्वखर्चाने रुग्णांवर उपचार करत असल्याचे ते सांगत असले तरी सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 18 कोटी 23 लाख रुपये उचलल्याची माहिती उघडकीला आली आहे. आतापर्यंत किती पेशंटवर तुम्ही उपचार केले ते आधी सांगा, असा खडा सवालही त्यांनी केला. पाच वर्षे मी प्रामाणिकपणे जनतेची कामे केली आहेत. यावेळेसच्या निवडणुकीत मशाल चिन्हाच्या पाठीशी राहून महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका, असे आवाहनही त्यांनी केले.
देवपूजा करून वडिलांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवघरात पूजन करून वडील स्व. भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आशीर्वाद घेतले. त्यानंतर तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजभवानी मातेचे दर्शन घेऊन धाराशिव शहरात दाखल झाले.
अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाने धाराशिव नगरीत मशालीचा जयघोष
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकापासून निघालेल्या रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (ए) आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा जयघोष करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली.