पक्या – हॅलो संन्ज्या, आरं कुठं हाईस, म्या अणदूरला यावं म्हणतोय …
संन्ज्या – ऑ , अणदूरला काय काम काढलंस रं ?
पक्या – काय नाय, साहेबाला भेटावं म्हटलं…
संन्ज्या – आरं साहेब गेलं की सोलापूरला, आता अणदूरला नाय थांबत…
पक्या – मग मालक तर भेटतील की ?
संन्ज्या – ते असतील पंपावर, संगप्पाबरोबर गप्पा मारत असतील…
पक्या – बरं मला एक सांग , तू साहेबांबरुबर की मालकाबरुबर ?
संन्ज्या – म्या सकाळी साहेबाबरुबर अन रात्री मालकाबरुबर ..
पक्या – च्या मारी , मी ते नाय इच्चारत ? प्रचार कुणाचा करतोस असं इच्चारलं..
संन्ज्या – अजून तसं काय ठरलं नाय, सगळेजणच कन्फ्यूज हायती..
पक्या – ऑ , धनु सरपंच तर सांगत व्हते, आम्ही सगळे मालकांबरुबर …
संन्ज्या – मालकांबरुबर असलं म्हंजी काय झालं , साहेबाचा आदेश कुठं मोडत्यात व्हय ?
पक्या – तरीच म्हटलं , संगाप्पा , धनु सरपंच, धमुर्याचा अप्पू, डॉ.बिराजदार सोडलं तर धाराशिवला कोण बी नाय आलं…
संन्ज्या – आरं , कालच्या अणदूरच्या रॅलीत सभापती बालू बी दिसला कि …
पक्या – मग तू हातात मशाल धरणार की ? घड्याळ बांधणार ?
संन्ज्या – म्या साहेबाचं पण ऐकणार , मालकांचं पण ऐकणार अन जे करायचं तेच करणार…
पक्या – च्या मारी, म्हजी नेमकं काय करणार ?
संन्ज्या – हे बघ, मतदान गुप्त असत, ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’, असं कुणी तरी म्हटलं हाईस कि …
पक्या – अगदी बरुबर बोललास बघ… नाय तर हे पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी एका दिवसात पक्ष बदलत्यात बघ…
संन्ज्या – हो ना, साहेबराव म्हणत व्हते, आता अणदूरची भाजप काँग्रेसमय झाली…
पक्या – ते कसं काय ?
संन्ज्या – पहिलं दीपक दादा आलं;आता पाठोपाठ सुनील मालक आले, मग निष्ठावंत राहिलं कुठं ?
पक्या – आता राजकारणात निष्ठां नावाची गोष्ट कुठं शिल्लक राहिली व्हय…
संन्ज्या – बरं ठिव फोन, मला शेताकडं जायचं हाय, म्हशीला पाणी अजून पाजाचं हाय…
पक्या – तू कुणाकुणाला पाणी पाजणार हे तुलाच माहित…
संन्ज्या – ह्या ह्या ह्या .. बरं आता ठिव फोन …
पक्या – बरं रात्री फोन कर… अजून लै बोलायचं हाय …
संन्ज्या – बरं बरं …निघतो मी …
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )