धाराशिव : भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करावयाची आहे, अशी भूलथापा देऊन विदेशातील एका भामट्याने बेंबळी येथील एका शिक्षकास ४६ लाखास गंडा घेतला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षकाने सायबर पोलिसात धाव घेतली आहे.
तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील एका शिक्षकाला मिलियन डॉलरचे आमिष दाखवून भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने तब्बल ४५ लाख ९० हजार १०० रुपयांना गंडवले. १०८ दिवस संपर्कात राहून दिवसाला ४२ हजार ५०० रुपये गुरुजींना गमवावे लागले. शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची असल्याचे सांगून कस्टम, एक्साइज, सेबी, आरबीआय बँक, व्हॅन आदीचे शुल्क व कर भरण्याचे निमित्त करत दोन अनोळखी महिलांनी हा गंडा घातला.
संबंधित गुरुजींना एलिझाबेथ जेरॉर्ड नावाने एका सोशल मीडिया अकाउंटवर मैत्रीची विनंती आली. शिक्षकाने ती स्वीकारली. महिलेने स्वत:ला युनायटेड नेशनची कर्मचारी असल्याचे सांगून भारतात शिक्षण क्षेत्रात गुुंतवणूक करण्याबाबतही सांगितले. यासाठी एका भारतीय व्यक्तीची गरजही व्यक्त केली. यावर शिक्षकाने विश्वास ठेवला. तेव्हा एका बॉक्समध्ये ३.६ मिलियन यूएस डॉलर पाठवले असून ते पार्सल सोडवून घेण्याची सूचनाही या महिलेने दिली. यासाठी सुरुवातीला ६६ हजार रुपये शुल्क मागितले. ऑनलाइन पैसे पाठवण्यासाठी बँक खाते क्रमांकही दिला. शिक्षकाने रक्कम भरली. नंतर मुंबईला पार्सल आल्याचे सांगून एक लाख ९६ हजार भरून घेतले. पुन्हा इन्शुरन्स चार्ज म्हणून दोन लाख २० हजार घेतले. १०८ दिवसांत ३० पेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून कस्टम, एक्साइज, सेबी, आरबीआय बँक, व्हॅन आदीचे शुल्क व कर भरण्याच्या निमित्ताने दोन अनोळखी महिलांनी ४५. ९० लाख हडप केले.
गुन्हा दाखल
आरोपी नामे-elizabeth jerord या नावाचे फेसबुक धारक, मोबाईल नं 7039344186 चा धारक, इंडिया ओव्हरसीएस बॅक खाते 231101000004304 चा धारक, आय. सी. आय.सी. आय बॅक खाते क्र 34420508352 , कॅनरा बॅक खाते क्र 110136163669, व्हॉटसअप नं 2217676305 चा धारक यांनी बेंबळी येथे कार्यरत असलेले शिक्षकास वेळोवेळी संपर्क साधुन त्यांना भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुक करावयाची आहे त्यासाठी त्यांचे कडील युएस डॉलर पाठविले आहेत ते भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळे टॅक्सचे नावाखाली दि. 29.02.2024 ते दि. 16.06.2024 रोजी 22.00 वा. सु. एकुण 45, 90, 100₹ विविध बॅक खात्यामध्ये भरण्यास सांगुन त्याबद्दल्यात फिर्यादीस रक्कम परत न करता नमुद शिक्षकाची ऑनलाईन पद्दतीने आर्थिक फसवणुक केली. अशा मजकुराच्या बेंबळी येथे कार्यरत असलेले शिक्षक यांनी दि.24.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420, सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तो नव्हे ती / फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात येणे भोवले…
फसवणूक झालेला शिक्षक रुईभर येथील रहिवासी असून, बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. फसवणूक करणारी विदेशातील 2 महिला असून, हा सेक्सटॉर्शनचा प्रकार तर नव्हे ना ? याची चौकशी सायबर पोलीस करीत आहे. फसवणूक झालेला शिक्षक डिप्रेशनमध्ये असल्याने त्याचे नाव बातमीत दिले नाही.फेसबुकच्या माध्यमातून या दोघांचा संपर्क झाला होता.
अन्य प्रकरणात फसलेल्यांमध्ये उच्चशिक्षितांचा आहे समावेश
- १७ मे रोजी दाखल गुन्ह्यात एका कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्याला सात लाख ४९ हजारांनी ऑनलाइन फसवल्याचे समोर आले. त्याला ऑनलाइन गेम्सचे टास्क देऊन पैसे भरण्यास सांगितले होते.
- २८ मे रोजी दाखल गुन्ह्यात एका महिलेला अॅमेझॉनवर पार्ट टाइम काम करून दररोज पाच ते सात हजार रुपयांची कमाई करण्याचे आमिष दाखवले. या महिलेला तब्बल सात लाख ४२ हजारांना ऑनलाइन गंडवण्यात आले.
- ११ जून रोजी दाखल गुन्ह्यात एका खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बनावट अॅपवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दुप्पट रक्कम देतो म्हणून १३ लाख ६ हजारांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला.
पैसे कमाविण्यासाठीचा शॉर्टकट नडतोय
पैसे कमावण्यासाठी शॉर्टकटच्या नादात ऑनलाइन गंडा घातला जात आहे. यात लवकर फिर्याद देऊन अकाउंट होल्ड केले तरच रक्कम मिळते. शक्यतो गंडा घालणारे सापडणे अवघड असते. कारण ते बँक खाते, आधार क्रमांक, पॅन, मोबाइल आदी अन्य व्यक्तींच्या नावाचे वापरत असतात. त्या व्यक्तीला आपल्या या बाबींचा वापर गंडा घालण्यासाठी होतोय, हे सुद्धा माहिती नसते. पोलिस कागदपत्रांवरून त्यांनाच पकडतात. तेव्हा ही गोष्ट त्यांना समजते.
– बबिता वाकडकर, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.