धाराशिव– शहरानजीक असलेल्या शेकापूर ग्रामपंचायतीत ग्रामनिधी आणि 15 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामात उघडकीस आलेल्या अपहार प्रकरणी तत्कालीन व विद्यमान सरपंचासह ग्रामसेवकावर कारवाई करून संबंधीतांकडून ही रक्कम वसूल करावी अशी मागणी किशोर हनुमंत लगदिवे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेकापूर गावात ग्रामपंचायतमार्फत विविध योजनेतून झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी किशोर लगदिवे यांनी केली होती. त्या अनुषंगाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. ए. भांगे यांनी चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. यामध्ये ग्रामनिधी आणि 15 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे.
यात 1 एप्रिल 2021 ते 31 जुलै 2023 या काळात सिमेंट रस्ता 1,50,000, सिमेंट रस्ता 1,85,000, संविधान चौक रस्ता 90,600, मजबुतीकरण 6,75,000, विहीर बुजविणे 2,18,000 अशा कामामध्ये 5,42,000 रुपयांची तफावत चौकशी अहवालात निदर्शनास आली आहे. तसेच 15 व्या वित्त आयोगातून एलईडी पथदिवे, सिमेंट रस्ता व नाली, रस्ता मजबुतीकरण, दोन नवीन विंधन विहीरी अशी कामे करण्यात आली. प्रत्यक्षात विंधन विहीरी न घेता 3,78,792 रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
सदरील कामे ही ग्रामपंचायतच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद न करता स्वतःच्या फायद्यासाठी रस्ता मजबुतीकरण व इतर कामे करण्यात आली. यासाठी पंचायत समितीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे सदर खर्च अवैध असून पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे. त्याचबरोबर किरण महादेव लगदिवे यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या चार ते पाच प्लॉटच्या नोंदी घेऊन एनए ले आऊट न करता परस्पर विक्री केली आहे. या नोंदी रद्द करून ग्रामपंचायत अपहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी असे किशोर लगदिवे यांनी म्हटले आहे.