धाराशिव: कृषी विभागाने बुधवारी धाराशिव शहरात मोठी कारवाई करत 30 टन (598 बॅग) रासायनिक खताचा काळाबाजार उघड केला आहे. यामध्ये डीएपी आणि 20:20:0 खताचा समावेश आहे. हा खतसाठा तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या खताची निर्मिती गुजरातमधील एका कंपनीने केली होती. या कंपनीचा परवाना निलंबित असतानाही खत निर्मिती केल्याचा आरोप आहे. कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे हा काळाबाजार उघड झाला.
जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्या पथकाने रंगेहात 8 लाखांचा खतसाठा वाहतूक होत असताना पकडला आणि आरोपीला अटक केली. ही कारवाई तुळजापूर-लातूर बायपासवर करण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्कतेमुळे खत वाहतूक करणारा ट्रक पाठलाग करून पकडण्यात आला. त्यानंतर मुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार तात्या भालेराव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.