धाराशिव: सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी वडीलास १० वर्षे सक्तमजुरी आणि ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहीते यांनी सोमवारी (दि.२२) हा निर्णय दिला आहे. दंडाच्या रकमेतून ५० हजार रुपये पिडीत मुलीस दिले जाणार आहेत. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, तर बचाव पक्षाने १ साक्षीदार तपासला. सरकारी पुरावे आणि शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांच्या युक्तीवादाच्या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आली.
प्रकरणाची हकीकत अशी की, १२ जानेवारी २०२२ रोजी पिडीतेने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की तिची आई आणि सावत्र वडील १० वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. तिचे शिक्षण मुंबईत आजीकडे झाले आणि ११ वी पासून ती नळदुर्गला शिक्षण घेण्यासाठी आली. ती तिची आई, लहान भाऊ आणि सावत्र वडीलांसोबत राहू लागली.
१० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास सावत्र वडील घरात आले आणि पिडीतेला कपडे काढायला सांगितले. तिने विरोध केला असता, आरोपीने तिला जीव मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास पिडीतेला आणि तिच्या आईला ठार मारण्याची धमकीही दिली.
पिडीतेने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आणि धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहीते यांचे समोर सुनावणी झाली. सर्व साक्षीदारांच्या साक्ष आणि पुरावे विचारात घेत आरोपीला १० वर्षाची सक्त मजुरी आणि ५१ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.