१९८४ साली तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गजवळील बालाघाटच्या कुसळी डोंगरावर तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, त्या वेळेच्या काही प्रभावशाली नेत्यांच्या पुढाकाराने , माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार (कै.) सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, आणि माजी आमदार (कै.) शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कारखाना उभा राहिला, ज्याची प्रतिदिन १२०० टन गाळप क्षमता होती.
सुरुवातीच्या काळात हा कारखाना उत्तमरीत्या चालू होता आणि शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवित होता. परंतु, कालांतराने भ्रष्टाचाराने या कारखान्याला आपले बळी बनवले आणि १०० कोटींचे कर्ज कारखान्याच्या गळ्यात पडले. ही परिस्थिती हाताळण्यासाठी (कै.) सिद्रामप्पा आलुरे गुरुजींना चेअरमन पदावर नेमले गेले, परंतु दुर्दैवाने ते ही या कारखान्याला वाचवू शकले नाहीत.
नंतर, हा कारखाना उद्योगपती अशोक जगदाळे यांच्या संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आला. मात्र, जगदाळे यांनी लेव्ही साखर परस्पर विकल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे कारखान्याच्या कर्जाच्या राशीमध्ये अजून भर पडली.
सध्या, या कारखान्याचे कर्ज जवळपास दीडशे कोटींच्या वर गेले आहे. गोकुळ संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आलेला हा कारखाना, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांच्या देखरेखीखाली आहे. पण मागील गळीत हंगामात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची बिले थकवण्यात आली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढला. आठ दिवसांत बिले मिळतील असे आश्वासन दिले गेले, परंतु अद्याप ऊसाचे बिले मिळाले नाहीत.
हे उदाहरण केवळ एक कारखान्याचे नाही, तर सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाच्या अपयशाचे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे प्रतिबिंब आहे. सहकारी साखर कारखाना मोडून स्वतःच्या फायद्यासाठी चालवण्याचे धंदे काही राजकीय नेत्यांनी सुरु केले आहेत आणि या यादीत मधुकरराव चव्हाण यांचे नाव देखील सामील झाले आहे.
या सर्व प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या आशा-आकांक्षा भंग पावल्या आहेत. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना हे एक उदाहरण आहे की कसे राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे एक उदयोन्मुख उद्योग मोडीत निघू शकतो. आता या कारखान्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावले उचलली जाणे आवश्यक आहे.
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह