धाराशिव मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. २०१९ मध्ये, शिवसेना आणि भाजपची युती होती, ज्यामध्ये शिवसेनेचे कैलास पाटील १३,४६७ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.
यंदाच्या निवडणुकीत मात्र परिस्थिती खूप बदललेली दिसत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. जर ही आघाडी कायम राहिली तर विद्यमान आमदार कैलास पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो. परंतु, महाविकास आघाडीत काही मतभेद किंवा फूट पडल्यास निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते.
धाराशिव मतदारसंघामध्ये धाराशिव शहरासह आजूबाजूची गावे आणि कळंब तालुक्याचा समावेश आहे. कळंब तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्राबल्य आहे, पण राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसची ताकद तुलनेने कमी आहे.
भाजप , शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली तरी या महायुतीत उमेदवारी कोणाला मिळेल, याबाबत सध्या स्पष्टता नाही. भाजपकडून नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अजित पिंगळे आणि मल्हार पाटील यांची उमेदवारीसाठी नावे पुढे येत आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, नितीन लांडगे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून सुरेश पाटील यांचे नाव समोर येत आहे.
तसेच, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता उमेदवारीवर डोळा ठेवून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. धाराशिवची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सध्या जोरात चालू आहे.
एकूणच, या निवडणुकीत कोणती बाजू वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण प्रत्येक पक्ष आपली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. यामुळे, धाराशिव मतदारसंघात एक चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे, ज्यात अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात.