धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ग्रामसेवक सुभाष सिद्राम चौगुले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. चौगुले यांनी घरकुल मिळवून देण्याच्या प्रस्तावासाठी तक्रारदाराकडून ₹3000 ची लाच मागितली होती. यापूर्वीही त्यांनी ₹2000 ची लाच घेतल्याचे मान्य केले आहे.
यातील तक्रारदार यांना शासनाकडून घरकुल मिळणेसाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय, तुळजापूर येथे पाठवण्यासाठी यातील आलोसे यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष यापूर्वी 2000/- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून आणखी 3000/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली यावरून आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती. त्यानंतर विभागाने सापळा रचून चौगुले यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी सापळ्याचे नेतृत्व केले. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांचे पर्यवेक्षण होते.पोलीस अंमलदार-आशिष पाटील, सिद्धेश्वर तावसकर यांनी सापळा पथकात मोलाची कामगिरी बजावली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणी सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती लाच मागत असेल तर त्यांनी तात्काळ तक्रार करावी. तक्रारीसाठी 02472 222879 या कार्यालयीन क्रमांकावर किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.