धाराशिव: शहरातील शासकीय दूध डेअरी समोरील जागेच्या हस्तांतरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांनी संघर्ष केला होता. अखेर या संघर्षाला यश आले असून, या यशाचे श्रेय समाज बांधवांच्या लढ्याला असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे.. शासनाला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे, असेही ते म्हणाले.
आमदार पाटील म्हणाले, शासकीय दूध योजनेतील जमीन व यंत्रसामुग्री जिल्हा/तालुका सहकारी दूध केंद्राकडे हस्तांतरित करण्याचा धोरणात्मक निर्णय ११ नोव्हेंबर २००२ रोजी घेण्यात आला होता. परंतु, हा प्रस्ताव वारंवार फेटाळण्यात आला होता. त्यानंतर समाज बांधवांनी विविध पातळीवर संघर्ष सुरू ठेवला. शिवसेना नगरसेवक देवानंद येडके यांनी १७ ते २२ मे २०२३ दरम्यान सहा दिवस उपोषण केले होते.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर ३१ मे २०२३ रोजी जागा हस्तांतरणासाठी बैठकीचे आयोजन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्री विखे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते, परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
चार जून २०१६ रोजी शासकीय दूध योजना, छत्रपती संभाजीनगर येथील जागा लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्मारक उभारण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी धाराशिव शहरातील शासकीय दूध योजना डेअरी परिसरातील एक एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. २३ मे २०२३ रोजी हा प्रस्ताव सादर करण्यात आला व २६ जून २०२३ रोजी विधानसभेत पाटील यांनी हा मुद्दा मांडला.
पाटील यांनी प्रधान सचिव कृषी, पशुसंवर्धन यांच्याकडे ६ जानेवारी २०२३ रोजी मागणी केली होती. सर्व पातळीवर समाज बांधवांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. “उशिरा का होईना, सरकारला शहाणपण सुचले,” असा टोला पाटील यांनी लगावला आहे. हाच निर्णय सरकारने वेळीच घेतला असता तर आतापर्यंत पुतळा उभारणीचे कामही पूर्ण झाले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना, परंतु सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल पाटील यांनी समाज बांधवांचे अभिनंदन केले आहे.