कळंब – शहरातील बस स्थानकासमोरील घाण पाणी आणि कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. या समस्येच्या निराकरणासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून, 21 ऑगस्ट 2024 रोजी बस रोको आंदोलन करण्याचा इशारा कळंब आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कळंब शहर हे जिल्ह्यातील महत्वाचे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असून, शेजारील जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी देखील एक महत्त्वाचे दुवा आहे. मात्र, बस स्थानकासमोरील घाण पाणी आणि कचऱ्यामुळे प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.
या समस्येकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आगार प्रमुख, विभाग नियंत्रक यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त केली.
पावसाळ्यात ही समस्या आणखी बिकट झाली असून, पावसाचे पाणी आणि नालीद्वारे येणारे घाण पाणी साचून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या समस्येवर त्वरित लक्ष देऊन तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांनी केली असून, 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बस रोको आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांसह अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.