तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. विजया राजेंद्र नांद्रे (वय ५६ वर्षे) या नाशिक येथील रहिवासी असून त्या ९ ऑगस्ट रोजी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या मंगळसूत्राची किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर विजया नांद्रे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस चोरीच्या घटनेचा तपास करत असून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मंदिर परिसरात गर्दीच्या वेळी भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शिराढोण येथे सौर उर्जा प्लॅटमधील साहित्य चोरी
शिराढोण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध सौर उर्जा प्लॅटमधील साहित्य चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सु.वडगाव शिवारातील शेत गट नं 244 मध्ये असलेल्या सेन्सट्रीम ग्रीन एनजी वन प्रायव्हेट लि. मुंबई कंपनीच्या सौर उर्जा प्लॅटमधून 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान अंदाजे 4,98,000 रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
चोरीला गेलेल्या साहित्यात इर्न्व्हटर, डी.सी. स्ट्रींग केबल, एमसी 4 कनेक्टर, एल ए केबल आणि कंड्युट पाईप यांचा समावेश आहे. याप्रकरणी इन्सपायर क्लीन एनर्जी प्रा लि. मुंबई कंपनीचे टेक्निशन नरेंद्र फुलचंद निंबाळकर यांनी 9 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.