धाराशिव: राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या दोन वादग्रस्त विधानांमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या सत्तेत असण्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याशिवाय, त्यांनी एका शेतकऱ्याला त्याच्या गावातील व्यथा मांडण्यासाठी आले असता, अवमानकारक भाषेत दमबाजी केली. या घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलले असून, त्यांना वर्षा निवासस्थानी तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वादग्रस्त विधान
तानाजी सावंत यांनी पहिला वादग्रस्त विधान करताना म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) बरोबर आपण मांडीला मांडी लावून सत्तेत बसलो असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात.” हे विधान करण्यामागे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असताना येणाऱ्या ताण-तणावावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला असला तरी, या विधानामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते अमोल मिटकरी, उमेश पाटील यांच्यासह अनेकांनी सावंत यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे आणि त्यांना आपल्या शब्दांची मर्यादा सांभाळण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
गाव संवाद दौऱ्यात शेतकऱ्याची अवकात काढली
दुसऱ्या वादग्रस्त घटनेत, सावंत यांनी गाव संवाद दौऱ्यात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याशी आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधला. व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याने आपली समस्या मांडल्यावर सावंत यांनी त्याला फटकारले. “कुणाची तर सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभा राहून बोलायचं, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हालाही कळतं, आम्ही xxx चे मोजतो. अवकातीत राहून बोलायचं,” असे म्हणत सावंत यांनी त्या शेतकऱ्याला अवमानकारक भाषेत धमकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सावंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी
या दोन वादग्रस्त घटनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाले आहेत. त्यांनी सावंत यांना तातडीने वर्षा निवासस्थानी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत सावंत यांना त्यांच्या विधानांबद्दल समज दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे
सावंत यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तसेच याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावंत यांचे विधान काय परिणाम घडवून आणेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.