मुंबई – संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चालले आहे हे आधी पहावे असा थेट हल्लाबोल करतानाच टिका करताना सभ्य भाषेत करा, पातळी सोडून करु नका असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत यावेळी दिला.सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल जी गरळ ओकली त्यावर सुनिल तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर आज पत्रकार परिषदेत दिले.
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षातंर्गत काय शब्दप्रयोग करावेत किंवा करु नयेत याबद्दल मला बोलायचे नाही परंतु आमच्या पक्षाच्या किंवा अजितदादा पवार यांच्याबद्दल टिका करताना संस्कृती ठेवून करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून केली होती असेही सुनिल तटकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अजितदादा पवार उत्तम पध्दतीने काम करत होते त्या अजितदादांचा उल्लेख अलीकडे संजय राऊत हे सिंचनदादा म्हणून करत आहेत. अनेक वेळा संजय राऊत अजितदादांच्या निर्णयामुळे, त्यांच्या प्रशासन कौशल्यामुळे कसे प्रभावीत असल्याचे माझ्याजवळ बोलायचे. मात्र तत्कालीन उध्दव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. ती भेट घेऊन आल्यानंतर संजय राऊत यांचा माझ्याकडे तीन चार दिवस आग्रह होता की, अजितदादांची भेट घालून द्यावी, चर्चा करायची आहे. एक दिवस नक्की झाला परंतु अजितदादांना काही कारणामुळे पोचता आले नाही त्यावेळी संजय राऊत यांना वाईट वाटले, रागही आला होता. मात्र पुन्हा दोन दिवसाने आम्ही बसलो त्यावेळी आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते.
मोदींच्या भेटीनंतर उध्दव ठाकरे यांचे मन विचलित झाले आहे. पुन्हा भाजपबरोबर सरकार स्थापन करावे असे मनात येत आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनाही संजय राऊत यांनी बोलायला लावले. ते काय बोलले ते विद्यमान मुख्यमंत्री असल्याने मी आज सांगणार नाही. ‘भाजपबरोबर जाणे आवश्यक आहे’ हे शब्द तास – दीड तास तेच बोलत होते. ही सांगण्याची वेळ आज आली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
तुमच्यापासून फारकत घेऊन दुसरीकडे गेले ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यावर न्यायालयीन लढाई सुरू आहे तरीसुद्धा तुम्ही टिकाटिप्पणी करता. आम्ही घेतलेल्या भूमिकेवरसुध्दा टिकाटिप्पणी करण्याचा पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे पण लिखाणात सुसंस्कृतपणा असावा, कालपर्यंत अजितदादांसारखे नेतृत्व असू शकत नाही असे म्हणणार्या संजय राऊतांनी शंभर दिवस झाल्यानंतर अशा प्रकारची टिका टिप्पणी करणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच यापेक्षा अधिक तुम्ही आमच्याशी बोलला आहात आज त्यावर भाष्य करायचे नाही असा दावाही सुनिल तटकरे यांनी यावेळी केला.
संजय राऊत तुम्ही टिका टिप्पणी जरुर करा पण तुम्ही सिंचन घोटाळ्यातील आरोपी असा आमचा उल्लेख करता मात्र कुठल्याही तपास यंत्रणांच्या तपासात अजितदादा किंवा मला आरोपी केले गेले नाही उलट संजय राऊत तुम्ही आरोपी आहात, आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही खडसावून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
शरद पवारसाहेब आजारी असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन – चार महिने दोघांमध्ये संवादही झाला नाही किंवा त्यांनी भेटही घेतली नाही याबद्दलही तीव्र नाराजी संजय राऊत यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सुनिल तटकरे यांनी योग्य आणि अचूक उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आणि मच्छीमार सेलचे राज्यप्रमुख चंदू पाटील उपस्थित होते.