तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा आत्मविश्वास नेहमीच टोकाचा असतो, पण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांच्या तुफान पराभवानंतर काहीसा ढासळलेला दिसतोय. पराभवाचा घाव ताजाच असतानाही, राणा दादांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत अर्चनाताईंना त्यांच्या चुलत दीराने – ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाखाहून अधिक मतांनी हरवलं. घरातल्या या राजकीय लढाईतच पाटील कुटुंबाचा खेळ खलास झाला.
लोकांना नवरा एका पक्षात आणि बायको दुसऱ्या पक्षात असण्याचं सिरीयल ड्रामा आवडला नाही, आणि अर्चनाताईंना दिल्लीत पाठवण्याऐवजी गल्लीतच ठेवून टाकलं. पण आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, आणि राणा दादा आपल्या पायात चपला घालून मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.
गावोगावी साडींचं वाटप करताना त्यांची धडपड दिसून येतेय. साड्या वाटायच्या, त्या पण अस्सल “महिला सक्षमीकरण” या नावाखाली! आज अणदूरमध्ये जवळपास 1,000 महिलांनी 300 रुपयांच्या साड्यांसाठी गर्दी केली, जणू काही ही साडी ‘लाडकी बहिण योजना’तली नवीन भेटच आहे. तुळजाभवानीच्या आशिर्वादाने, साड्यांच्या जादूने आता राणा दादांच्या मनात एकच विचार – महिलांना खूश करा आणि मतंही मिळवा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ सुरू करून महिलांना दरमहा दीड हजाराची ओवाळणी दिली आहे, आता राणा दादा फुकट साड्यांनी त्या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न करतायत. पण, त्या लाडक्या बहिणी आता राणा दादांना मते देतील का? की अर्चनाताईप्रमाणे त्यांनाही गल्लीतच ठेवतील? हे मात्र नोव्हेंबरमध्येच कळणार. साडीचा धागा आणि राजकारणाचा गुंता, तोवर फक्त बघत राहायचं!
– बोरुबहाद्दर