धाराशिव: धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही काही नवीन बाब नाही. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ओंकार जाधवर (वय २२) या तरुणाचा गुरुवारी रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
धाराशिव नगरपालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. रस्त्यांची कामे करून घेण्यासाठी समक्ष अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने शहरातील ११० कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. या कामांचे टेंडर एक वर्षांपूर्वी निघाले होते आणि कामांचे वाटपही झाले होते. वर्क ऑर्डर निघून सहा महिने होऊन गेले तरी पाच ते दहा कामे सोडली तर इतर कोणतेही काम सुरू झालेले नाही.
यामागचे कारण शोधले असता, सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामे वाटप केल्याचे समोर आले आहे. काम नोंदणीकृत कंत्राटदाराच्या नावावर असले तरी प्रत्यक्षात काम मात्र कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्याकडे आवश्यक यंत्रणा आणि पैसा उपलब्ध नसल्याने ही कामे रखडली आहेत. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यांचे जीव धोक्यात येत आहेत.
ओंकार जाधवर या तरुणाच्या मृत्युनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. त्यांनी आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला घटनस्थळी आणले आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र, निवडणुका जवळ आल्यावर हे आंदोलन करण्यात आल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ देऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.