( निवडणूक हंगाम सुरू आहे, आणि प्रत्येक जण “तिकीट मलाच मिळणार” असं सांगत आहे. या पार्श्वभूमीवर पारावरच्या गप्पा रंगत आहेत )
पिंट्या: “अरे, महाइकास आघाडीकडं तुळजापूरमध्ये इच्छुकांची चढाओढ चालली आहे. सगळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. आणि तिकडे सिंह तिकीट फायनल करून कामाला लागलाय. बाकी भाऊ, आण्णा, ताई, भैय्या सगळेच तिकीट माझंच म्हणून गावभर फिरत आहेत!”
बब्या: “हो, अरे, उद्दोजक भाऊ तर चार वर्ष गायब होता, आता त्याची रिंगटोनच ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ अशी आहे. आण्णा तर म्हातारे झालेत, त्यांना तिकीट मिळणार की नाही याची चिंता आहे. ताई आणि भैय्या तर एक जिल्हा परिषद मतदारसंघापुरतेच जाऊन येतात. बाकी चिल्लरही आहेतच, नोट दिसली की सगळ्यांचं सुट्टं होतं!”
पिण्या:“सगळं खरं आहे, पण जागा एक आणि तिकीट मागणारे चार जण! या तिकीटाचे वनफोर्थ करून द्यावं काय?”
पिंट्या: “आरं, सगळ्यांना वाटतंय तिकीट मलाच मिळणार. ह्यांचं काय भारीच आहे!”
बब्या: “मला वाटतंय हे सगळे थिएटरमधल्या शिनेमाचं तिकीट मागतायत की काय? सगळ्यांना एक-एक तिकीट मिळावं! आणि आपलं मात्र इथे फुकटचं मनोरंजन होतंय.”
पिंट्या: “आरं नाही रं, मला वाटतंय एसटी बसचं तिकीट मलाच मिळणार असं सांगत सुटलेत हे लोक!”
(आणि तिघेही जोरात हसतात.)
पिण्या: “तसं बघायला गेलं तर काही लोकांनी तिकीट मिळालंय हे समजूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. पाहिलं का उद्योजक भाऊंच्या बॅनरवर ‘आपला आमदार’ असं छापलंय! लोकं समजलेच!”
बब्या: “हो हो, उद्योजक भाऊंचं ठीक आहे, पण आण्णाचं काय? त्यांचं पोस्टर बघून लोकांना असं वाटलं की त्यांनी निवडणुकीत विजय मिळवलाच आहे! कोण म्हणतंय ह्यांना तिकीट नाही मिळणार!”
पिंट्या: “तसं ताईचं बघा, साहेबांनी अजूनही घोषणा केली नाही तरी एकीकडे बॅनरवर ‘आपली ताई’ आणि दुसरीकडे ‘संपूर्ण जनता माझी!’ काय लय भारी!”
पिण्या: “भैय्या पण भारीच आहेत! गावात फिरताना अशा पद्धतीने हात हलवून सलाम करत होते की जणू उद्या शपथविधी सोहळा आहे!”
(आणि तिघे पुन्हा हसतात)
बब्या: “यार, यांचं ठीक आहे, पण खरं सांगतो, आपल्याला कोणतं तिकीट मिळणार?”
पिंट्या: “काय म्हणतोस?”
बब्या:”म्हणजे, निवडणुकीचं नाही, आपण उद्या जत्रेत जाऊया. आपल्याला खेळाचं किंवा झोपडपट्टीतल्या ‘पारावरच्या गप्पा’चा तिकीट मिळणार का बघा!”
पिण्या: “तसं बघता, तिकीटच मिळणार असेल तर मेला ‘पारावरचा गप्पिष्ट’ असं नामांकनच मिळेल की!”
पिंट्या: “सध्याच्या निवडणुकीच्या गोंधळात तेच काय कमी आहे!”
(आणि सगळे एकमेकांकडे बघत हसतात.)