धाराशिव जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे, आणि जिल्ह्यातील चारही प्रमुख मतदारसंघात बंडखोरीचे वारे घोंगावत आहेत. या बंडखोरीमुळे मतदारसंघांमध्ये राजकीय अस्थिरता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर, काही निष्ठावंत आणि प्रबळ नेत्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे, ज्यामुळे पक्षांतील अंतर्गत संघर्ष अधिक उफाळून आला आहे.
परंडा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता
परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर दोन्ही उमेदवारांपैकी एकाने माघार घ्यावी का, यावर विचार सुरू आहे, पण अद्याप निश्चित निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली असून या लढतीकडे जिल्ह्यातील राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव मतदारसंघ: दोन्ही शिवसेनेत बंडखोरी
धाराशिव मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही गटांमध्ये बंडखोरीचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे गटाने विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडून भाजपमधून आलेल्या अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी देखील बंडखोरीची घोषणा केली आहे. या दोन्ही बंडखोरीमुळे धाराशिव मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
तुळजापूर मतदारसंघ: बहुरंगी बंडखोरीचे दृश्य
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातही बंडखोरीचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर, रुपामाता बँकेचे चेअरमन ऍड. व्यंकट गुंड यांनी बंडखोरीचे इशारे दिले आहेत. तसेच काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी दिली असता, माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनीही बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. इतकेच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अशोक जगदाळे यांनीही या निवडणुकीत बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. या तीन बंडखोर उमेदवारांमुळे तुळजापूर मतदारसंघात बहुरंगी राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
उमरगा (राखीव) मतदारसंघात बंडखोरीची लाट
उमरगा (राखीव) मतदारसंघात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाने प्रवीण स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. तथापि, या निर्णयानंतर कडवट शिवसैनिक विलास व्हटकर यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना ( उद्धव ठाकरे )पक्षासमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अर्ज छाननी आणि माघारीच्या तारीख
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, उद्या ३० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे. या तारखेनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल आणि अंतिम उमेदवार यादी समोर येईल. सध्या असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिकच रोचक आणि तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यातील या सर्व घटनांनी निवडणुकीचा रंग आणखी गडद केला आहे. बंडखोरीच्या या प्रवाहात कोण माघार घेणार आणि कोण अंतिम लढाईसाठी मैदानात उतरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.