धाराशिव- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल 4 हजार रुपये, सोयाबीनला 7 हजार रुपये हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्र जनजागर यात्रेला सुरुवात झाली आहे. सदर मागण्यांबाबत त्यांनी तुळजापूर तालुक्यातील शहापूर, गुजनूर, निलेगाव, खुदावाडी, दहिटणे, गुळहळ्ळी व परिसरातील गावात शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती केली.
जनजागर यात्रेत बोलताना जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, यावर्षी ऊसाला किमान साडेतीन ते चार हजार प्रतिटन भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर सोयाबीन काढणी खर्च व इतर खर्च मिळून उत्पादनाच्या दुप्पट खर्च होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहापूर येथील शेतकरी नागनाथ सावकार, दिनेश जगताप, दत्ता व्हंताळे यांनी जोपर्यंत कारखाने एफआरपी जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस देणार नाही असे नमूद केले.
त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बाबतीतील सर्व व्यथा मांडल्या. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष इंगळे म्हणाले की, सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च व शेतकऱ्याना सध्या मिळत असलेला भाव यात मोठी तफावत आहे. असेच चालू राहिले तर आत्महत्यांचे प्रमाण वाढत जाईल आणि शेतकरी कधीच फायद्यात राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे व शासन दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा या मांडल्या पाहिजे अशी इंगळे यांनी नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात नवरात्रीनंतर ऊस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी जनजागर यात्रेत हक्काचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे. अशी मागणीही जोर धरत आहे. इंगळे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या भावना या सरकार दरबारी पोहोचणार याची ग्वाही देऊन ऊस व सोयाबीनला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल याबाबत जिल्हाभरात जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लवटे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मकबूल मुल्ला, प्रगतशील शेतकरी भास्कर सुरवसे, नागनाथ सुरवसे, विभागीय अध्यक्ष युवराज नवाडे, शहापूर येथील शेतकरी नेते मधुकर लवटे, सुखदेव गोरे, राजेंद्र सुरवसे, गणेश जगताप नसीर पटेल, प्रकाश शिंदे, लक्ष्मण व्हंताळे, परमेश्वर व्हंताळे, शिवाजी जगताप इत्यादी शेतकरी उपस्थित होते.