तुळजापूर: बहुचर्चित तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे धीरज पाटील आणि महायुतीचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात थेट दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या लढतीकडे मतदारांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत धीरज पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील हे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरणार आहेत. काँग्रेसचे धीरज पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), पक्षाचा पाठिंबा आहे. तर भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.
इतर प्रमुख उमेदवारांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अण्णासाहेब दराडे, ऑल इंडिया इन्कलाबचे तांबोळी शब्बीर, राष्ट्रीय समाज पक्षाचे धनंजय पाटील, आदर्श संग्राम पार्टीचे धीरज पाटील, आझाद समाज पार्टीचे भैय्यासाहेब नागटिळे, समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक अपक्ष उमेदवारही या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अपक्षांमध्ये आमीर इब्राहिमशेख, आमीर सरदार शेख, उज्वला गाटे, काकासाहेब राठोड, योगेश केदार, तात्या रोडे, दत्तात्रय कदम, धनाजी हुबे, पूजा देडे, मन्सूर शेख, गणेश रोचकरी, सत्यवान सुरवसे यांचा समावेश आहे.
मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे तुळजापूर मतदारसंघाच्या राजकीय वातावरणात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. चव्हाण हे पाच वेळा निवडून आलेले माजी मंत्री असून, त्यांनी एकूण सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. या वेळी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, अखेरीस त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अशोक जगदाळे, ज्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले होते, त्यांनाही अखेर अर्ज माघारी घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधित्व करणारे अण्णासाहेब दराडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून, ते या निवडणुकीत युवकांचा आधार घेत आहेत. दराडे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार असून, त्यांना स्थानिक स्तरावर काही विशिष्ट गटांचा पाठिंबा मिळत असल्याचे कळते.
मराठा चळवळीतून महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेले योगेश केदार यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. केदार हे शिवसेनेचे माजी प्रवक्ते राहिले आहेत आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यातील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या आघाडीचे छत्रपती संभाजी महाराज यांचा पाठिंबा मिळाला आहे. स्वराज्य पक्षाचे व्यंकट गुंड यांनी आपला अर्ज मागे घेत योगेश केदार यांना पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या निवडणुकीत योगेश केदार यांच्याकडून रंगतदार लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुळजापूर विधानसभा निवडणूक यावेळी दुरंगी होणार असून, महाविकास आघाडीचे धीरज पाटील आणि महायुतीचे राणाजगजितसिंह पाटील यांच्यात तीव्र संघर्ष होईल, अशी शक्यता आहे. तसेच, इतर उमेदवार आणि अपक्ष देखील या निवडणुकीला वेगवेगळे रंगत आणणार आहेत.