धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. धाराशिव शहरात दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत तर शिराढोण तालुक्यात शेतातून रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतुलकुमार सुर्यकांत अलकुंटे (४२, रा. डी.आय. रोड, समता नगर) यांची २०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५ एस ५८५०) ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली.
त्याचप्रमाणे सत्यविजय शिवाजी मोहिते (३५, रा. सांजा) यांची १५,००० रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा स्कूटी (क्र. एमएच १३ सीसी १८५६) ८ डिसेंबर रोजी धाराशिव बसस्थानकावरून चोरीला गेली.
शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरद पांडुरंग रितापुरे (३५, रा. भाटशिरपुरा, ता. कळंब) यांच्या शेतात काम करणाऱ्या तीन महिला मजुरांचे ३८,७०० रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. शुभम दादाराव पाटील (रा. भाटशिरपुरा) याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्हीही प्रकरणांमध्ये भादंवि कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.