धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही तस्करी केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठीही धोकादायक ठरत आहे. गोवा, विमल, हिरा, आर. के. एफ. के., आरसीबी यांसारख्या नामांकित ब्रँडचा गुटखा कर्नाटक राज्यातील हुमनाबाद, बसवकल्याण येथून मोठ्या प्रमाणात आणला जातो. ट्रक, आयशर, टेम्पो आदी वाहनांचा वापर करून हा गुटखा उमरगा – लोहारा, बेंबळी, – धाराशिव – येरमाळा- वाशी- भूम – आंबी – जामखेड या मार्गाने नगर जिल्ह्यात पोहोचवला जातो आणि तेथून तो संपूर्ण महाराष्ट्रात वितरित केला जातो.
या तस्करीत पोलिसांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे. करमाळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला एक वसूलदार या सर्व गैरकृत्यांना पाठिशी घालत असून, तो सर्व पोलीस स्टेशनना ‘मॅनेज’ करतो. यासाठी दरमहा किमान २५ लाख रुपये वाटप होत असल्याची चर्चा आहे. ही सर्व वाहने जामखेडच्या एका विशिष्ट ट्रान्सपोर्टची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकही या हप्त्याखोरीत सहभागी असल्याचे बोलले जात आहे. दरमहा हप्ता मिळाला तर ते ‘खुश’ असतात आणि तस्करीकडे दुर्लक्ष करतात. जर हप्ता मिळाला नाही तर वाहने पकडली जातात आणि नंतर ‘मॅनेज’ झाल्यावर ती सोडून दिली जातात. यामुळे जिल्ह्यातील गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी पूर्णपणे फसली आहे.
ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हा गुटखा जातो, तेथील पोलीस निरीक्षक मूग गिळून गप्प बसले तर स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करते, मात्र या शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव “मोरे” यांचे पंख छाटल्यामुळे ते “लांडोर” होऊन बसलेत आणि अर्थ विभागाचे कानगुडे हे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे “अंधेर नगरी, चौपट राजा” असा कारभार सुरु आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुटखा तस्करी रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, तरुण पिढीच्या आरोग्यासह कायदा आणि सुव्यवस्थेलाही धोका निर्माण होईल.