धाराशिव जिल्हा नेहमीच पाण्याअभावी चर्चेत राहतो, पण आता एका हुशार वाघामुळे वन विभागाचा दृष्टीआभाव चर्चेत आला आहे. विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवच्या येडशी रामलिंग अभयारण्यात दाखल झालेल्या या वाघाने जणू ‘इथूनच पुढे राहायचं’ असा निर्धार केल्याचं दिसत आहे. मात्र, त्याच्या या नव्या धाडसाने वन अधिकाऱ्यांची दमछाक केली आहे.
सुरुवातीचं नाट्य…
एका महिन्यापूर्वी विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात आला. त्याच्या आगमनाने येडशीच्या वनक्षेत्राला ‘काहीतरी जिवंतपणा’ आला. या वाघाच्या आगमनाने गावकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं, तर वन अधिकाऱ्यांमध्ये धास्ती! वाघ पकडण्यासाठी ताडोबाच्या ५० तज्ज्ञांची टीम धाराशिवला पाठवली. गावकऱ्यांनी तातडीने वाघाचे दर्शन घेतले, पण ही संपूर्ण टीम मात्र वाघाच्या मागावर सापडलीच नाही. सहा दिवस शोधूनही वाघ सापडत नसल्याने ही टीम शेवटी निराशेने परत गेली.
वाघाचा धाराशिव दौरा…
ताडोबाच्या टीमने हार मानली असली तरी वाघाने मात्र आपला “धाराशिव दर्शन” दौरा सुरू ठेवला आहे. कधी येडशी अभयारण्यात दिसणारा हा वाघ, कधी बार्शी तालुक्यातील वडजी परिसरात तर कधी भूम तालुक्यातील सुकटा भागात चक्क लोकांशी संवाद साधतो आहे. पण वन अधिकाऱ्यांसाठी मात्र हा वाघ अदृश्य आहे.वाघ पुढे आणि वन अधिकारी मागे यामुळे स्थानिक लोक हसत म्हणतात, “वन अधिकाऱ्यांना दिसायला जॅक ल्यूकसचा चष्मा लावावा लागेल.”
पुण्याच्या टीमची शड्डू ठोक तयारी…
ताडोबाच्या टीमच्या अपयशानंतर आता पुण्याची नवी चमू वाघ पकडण्यासाठी मैदानात उतरली आहे. गावकरी याकडे मनोरंजन म्हणून पाहत आहेत. पुण्याच्या टीमने अत्याधुनिक उपकरणं, ड्रोन, कॅमेरे, आणि दंडुके घेऊन शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र वाघानेही आपलं “स्मार्टनेस” सिद्ध करत त्यांना वाऱ्यावर फिरवलं आहे.
वन विभागाची दृष्टी कमी की वाघाचा हुशारपणा?
गावकऱ्यांना वाघ दिसतो, त्याचे फोटो काढले जातात, व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण वन अधिकाऱ्यांच्या नजरांना मात्र वाघ दिसत नाही. “वाघ खरंच इथं आहे का? की फक्त गावकऱ्यांना भास होतोय?” असा खोचक सवाल काही अधिकारी करत आहेत. यावर स्थानिक लोकांनी थेट उत्तर दिलं, “वाघ आहे, पण वन अधिकाऱ्यांना दिसायला कदाचित फॉरेस्टचा अनुभव कमी पडतोय!”
वाघाचा धाराशिव जिल्ह्यात रहायचा निर्णय?
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा वाघ धाराशिव जिल्ह्यात पक्कं ठाण मांडण्याच्या तयारीत आहे. “इथं जंगल नाही, दुष्काळ आहे, तरीही मी राहणार!” असा त्याचा निर्धार दिसतो. यामुळे वाघ आता ‘धाराशिव पर्यटन राजदूत’ म्हणून नियुक्त व्हावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
विनोदातच गंभीर प्रश्न…
या वाघाच्या नाट्यमय हालचालींनी धाराशिव जिल्ह्यात मनोरंजन निर्माण केलं आहे. पण दुसरीकडे, जंगल नष्ट झाल्यामुळे वन्यजीव गावांमध्ये येऊ लागल्याचा गंभीर प्रश्नही समोर आला आहे. वाघ पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या वन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
धाराशिवचा वाघ वन अधिकाऱ्यांना केव्हा दिसणार? की तो वन विभागाचं “आत्मचिंतन अभियान” सुरू करण्याचं कारण बनणार, हे पाहणं मनोरंजक ठरेल!