तुळजापूर: तुळजापूरच्या तहसील कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून सीसीटीव्ही बंद असल्याने कर्मचारी उघडपणे लाचखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि बायोमेट्रिक यंत्रणा बंद असल्याने हजेरी पुस्तिकेत फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तहसीलदारांच्या केबिनमध्ये नियमानुसार एसी बसवता येत नसतानाही तो कसा बसवण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केबिनच्या सुशोभीकरणावर झालेला खर्च कुठून आला, याचीही चौकशीची मागणी होत आहे.
तहसील कार्यालयात दलालांचा अड्डा झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तहसिलदार कार्यालयातील कागदपत्रांसाठी अमरण उपोषणाचा इशारा
तुळजापूर: तुळजापूर येथील तहसिलदार कार्यालयात दालनाच्या कामासंदर्भातील कागदपत्रांसाठी शिवसैनिक अमोल जाधव यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
श्री. जाधव यांनी दिलेल्या अर्जानुसार, तहसिलदार साहेबांच्या दालनाच्या कामाचे अंदाजपत्रक, वर्कऑर्डर, परवानगी, पूर्णत्वाचा दाखला आणि संपूर्ण संचिका न्यायालयीन कामकाजाकरिता आवश्यक आहे. त्यांनी यापूर्वी ११ डिसेंबर २०२४ रोजी यासंदर्भात अर्ज केला होता.
११ जानेवारी २०२५ रोजी अमरण उपोषण करण्याचा त्यांचा मानस होता, परंतु जलयात्रा आणि आक्रोश मोर्चा असल्याने ते त्या दिवशी शक्य झाले नाही. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक मशीन चालू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
२५ जानेवारी २०२५ पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तहसिलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण करावे लागेल, असा इशारा श्री. जाधव यांनी दिला आहे.