धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नोकरी लावतो, अशी झकास बतावणी करत तुळजापूर गट शिक्षणाधिकारी मॅडमच्या दिवट्या पोराने १७ तरुणांना अक्षरशः धो-धो फसवले आहे. प्रत्येकी ४ ते ५ लाख असे चांगलेच गंडवून त्याने तब्बल ४० लाखांचा माल उचलला.
फसलेल्या तरुणांना “हे बघा तुमची नियुक्ती!” म्हणत त्याने खोटे नियुक्ती पत्र दाखवले आणि स्वतः मात्र या पैशात चैन करत राहिला. पण हल्लीच्या तरुणांना कागदाच्या गडगडाटाने नाही, तर प्रत्यक्ष नोकरीने समाधान मिळते, हे त्याच्या लक्षातच आलं नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अणदूरच्या काही तरुणांनी थेट नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, इथेही कायम तपास सुरूच चा मंत्र पोलीस म्हणतायत.
या भामट्याची खासीयत काय?
साहेबांच्या मेहुण्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा तो सतत गवगवा करत असतो. फोटोबाजी करत, साहेबांबरोबरचे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो दाखवत, तो लोकांवर भारी छाप पाडतो. म्हणजे एका क्लिकमध्येच लोकांची श्रद्धा जागी!
आता प्रश्न असा की या दिवट्या पोरावर पोलीस गुन्हा दाखल करणार की अजूनही “तपास सुरूच” म्हणत चहा ढोसत राहणार? उत्तर फक्त काळच देईल. तोपर्यंत नोकरीच्या गप्पांवर पैसा उडवण्याआधी चारदा विचार करा!