धाराशिव जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या ५० बसपैकी २५ बस चार दिवसांत दाखल झाल्या. यात तुळजापूर आगाराला १०, धाराशिव आगाराला १० आणि कळंब आगाराला ५ बसेस मिळाल्या.
आता या गाड्या दिल्या होत्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी, पण पूजन कोणाच्या हस्ते झाले? तर थेट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत! म्हणजे “गाडी आमच्या बापाची, पण नंबर प्लेट त्यांच्या नावाची” अशीच परिस्थिती.
राणा पाटील यांनी अगदी आमदारांसाठी राखीव सीटवर बसून प्रवासही केला, आणि बसच्या आधुनिक सुविधांची माहिती घेतली. शेवटी त्यांनी “प्रेमपत्र” अर्थात कृतज्ञता पत्र लिहून सरनाईक आणि राज्य सरकारचे आभार मानले. म्हणजे “तुम्ही करून दाखवा, आम्ही कौतुक करून घेऊ” असा हा प्रकार.
पालकमंत्री सरनाईक यांनी बस आणून दाखवल्या, आणि राणा पाटील यांनी त्यावर आपली “मालकी” असल्यासारखे पूजन केले. आता प्रवाशांना बस मिळाल्या, हे महत्त्वाचं; पण राजकारण्यांच्या या “प्रेमपत्रां”वर जनता काय विचार करते, हे पाहणं रंजक ठरेल!
Video