धाराशिव: “तुमचा हरीकल्याण येळगट्टे करू!” अशी धमकी देत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या भामटा आशिष विसाळचे आणखी धक्कादायक कारनामे समोर येत आहेत.
बनावट सही, जुने लेटरपॅड आणि अधिकारी ‘गंडवण्याचा’ डाव
विसाळने आ. सुरेश धस यांचे जुने लेटरपॅड वापरून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी पाठवल्या. या अर्जांवर धस यांची बनावट सही मारली आणि त्यावर कोणताही जावक क्रमांक नव्हता! तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी या बनावट तक्रारींची दाखल घेत, अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी समित्या स्थापन केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांचा गंभीर हलगर्जीपणा – खात्रीच केली नाही!
या तक्रारी आ. सुरेश धस यांनी दिल्या आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना साधा फोनही केला नाही! त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिला कर्मचाऱ्यांना त्रास, खंडणीसाठी दबाव
विसाळ याने महिला कर्मचाऱ्यांना मुद्दाम त्रास दिला. त्यांना चुकीच्या चौकशीत गोवण्याचा प्रयत्न केला. तसेच, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना “तुमच्या नावावर चौकशी टाकतो, मोठे प्रकरण करतो” असं सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.
‘हरीकल्याण’ धमकी – नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला गंडवलं!
नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांना ब्लॅकमेल करून स्वतःचं ‘कल्याण’ करून घेतलं. त्यामुळे आता सरकारी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रशासनाने स्वतः फिर्याद द्यावी – ‘या भामट्याला धडा शिकवा!’
या गंभीर प्रकारानंतर “प्रशासनाने स्वतः पुढे येऊन या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करावा” अशी मागणी होत आहे. सरकारी अधिकाऱ्यांना गंडवणाऱ्या या बनावट ‘पीए’ला धडा शिकवण्याची वेळ आली आहे!
➡ पोलिसांचा तपास सुरू – आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता!