धाराशिव – महिला बचत गटाच्या सदस्यांची लाखोंची फसवणूक करून त्यांना जादूटोनाच्या भीतीत ठेवणाऱ्या सविता सचिन डिकले व सचिन पांडुरंग डिकले या दोघांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
तांदुळवाडी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सदस्यांनी ICICI बँकेकडून ₹4,95,000 चे कर्ज घेतले होते. मात्र, सचिव सविता डिकले हिने गटाच्या सदस्यांकडून ₹3,90,000 उसने घेऊन परतफेड न करता फसवणूक केली.
जादूटोना आणि धमकीचा ‘खेळ’
फिर्यादी मधुमंजली संदीप काळे (वय 32) यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपी सविता डिकले हिने थेट दैवी शक्ती आणि जादूटोनाचा वापर करून महिलांना धमकावले. “माझ्या अंगात शक्ती आहे, भानामती करता येते, तुझ्या वंशाचा दिवा बुडवून टाकेन!” अशी धमकी देत, तलवारीने जीव मारण्याचाही प्रयत्न केला.
याशिवाय, घराच्या खिडकीतून लिंबू, सुया, हळदी-कुंकू, बुक्का आणि राख टाकून जादूटोना करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गुन्हा दाखल
मधुमंजली काळे यांच्या फिर्यादीवरून दि. 03 फेब्रुवारी 2025 रोजी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
लावलेली कलमे:
- भारतीय दंड संहिता: कलम 318(4), 316(2), 352, 351(2), 3(5)
- महाराष्ट्र जादूटोना प्रतिबंध अधिनियम 2013: कलम 3(2)
गावात भीतीचे वातावरण
या प्रकारामुळे तांदुळवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही काही दिवस त्यांची दखल घेतली गेली नव्हती. मात्र, अखेर गुन्हा दाखल झाल्याने पीडित महिलांना दिलासा मिळाला आहे.
पुढील तपास पोलीस करत असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.