धाराशिव – महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये 2014 पासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मनसे तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी गंभीर आरोप केले असून, याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांची फेरनेमणूक करावी तसेच आरोपी अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भ्रष्टाचाराची चौकशी फसवणुकीची?
शेख यांच्या म्हणण्यानुसार, कामगार कल्याणकारी मंडळातील विविध योजनांमध्ये 2014 ते 2022 दरम्यान कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यांनी वेळोवेळी तक्रारी दिल्या असतानाही याची योग्य चौकशी करण्यात आली नाही. याउलट, तत्कालीन उपअधीक्षक श्री. संपत्ते यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून चौकशी केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. यामुळे फेरचौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तपास अधिकाऱ्यांवर संशय
शेख यांनी एसीबीचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्यावरही गंभीर आरोप करताना, त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी 2013 ते 2017 या कालावधीतीलच भ्रष्टाचाराची चौकशी केली, मात्र लॉकडाऊन काळात झालेल्या मोठ्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तसेच, जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी दलालांच्या मदतीने कामगारांसाठी असलेल्या संसार उपयोगी साहित्य बॉक्ससारख्या योजनांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुरावे असूनही दुर्लक्ष?
शेख यांनी कामगार कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचाराचा पुरावा गोळा करण्यासाठी स्वतः काही काळ संबंधित लोकांसोबत काम केल्याचे सांगितले आहे. त्यांनी तीन कामगारांच्या मुलांसाठी मंजूर झालेल्या प्रत्येकी ₹35,000 च्या क्लेमचे पैसे त्यांच्या खात्यात न जाता, अन्यत्र वळवले गेल्याचा ठोस पुरावा मिळवला. हा पुरावा प्रधान सचिव (कामगार विभाग) यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी 2013-2017 मधील भ्रष्टाचार चौकशीचे आदेश दिले, मात्र त्यानंतरही अपहार थांबला नाही, असे त्यांनी नमूद केले.
चौकशी अधिकाऱ्यांची फेरनेमणूक आणि बेहिशोबी संपत्तीची चौकशीची मागणी
शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतील संशयास्पद बाबींची चौकशी होऊन, तटस्थ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, जिल्हा कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे व एसीबीचे तपास अधिकारी विकास राठोड यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करण्यात यावी. कामगार कल्याणकारी मंडळाच्या 2013 ते 2025 या कालावधीतील सर्व योजनांची फेरचौकशी करून सर्व लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सरकारकडे कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलन
शेख यांनी 15 दिवसांत योग्य कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या जिवीताला धोका असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.